कोल्हापूर – राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे अंबा घाटात एक भीषण अपघात घडला. कोल्हापूर–रत्नागिरीला जोडणाऱ्या अंबा घाटात पहाटे ५ वाजता मध्यप्रदेश पासिंग असलेली खासगी बस जवळपास 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली. या बसमधील सर्व प्रवासी नेपाळमधून आलेले कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते रत्नागिरीतील अंबा बागेत कामासाठी जात होते.
15 प्रवासी जखमी, जीवितहानी टळली
अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 प्रवासी होते. यापैकी 15 जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात होताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्परतेने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.
चक्री वळणावर वाहन कोसळले हा अपघात अंबा घाटातील चक्री वळणावर झाला. बस दरीत कोसळताच तिचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. बसला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अलीकडील अपघाताची आठवण दरम्यान, याच आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक अपघात झाला होता. २ डिसेंबर रोजी हर्णे बायपासवर पुण्याहून आलेल्या पर्यटकांची मिनीबस उलटल्याने १० जण जखमी झाले होते. त्या अपघातातही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.





