नांदेड – जिल्ह्यातील आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सक्षम ताटे या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना २७ नोव्हेंबर रोजी जुनागंज भागात घडली. या घटनेआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यात मुलीचा भाऊ आणि त्याचे पाच ते सहा साथीदार सक्षमच्या घराजवळ रेकी करताना दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध वेगाने सुरू केला आहे.
सातवा आरोपी अटक सक्षम ताटे खून प्रकरणात आतापर्यंत एक महिला आणि एक अल्पवयीन अशा सहा व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी चार आरोपी ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
पोलिसांनी मंगळवारी, २ डिसेंबर रोजी, या प्रकरणातील सातवा आरोपी अमन देविदास शिरसे (वय २२, रा. माळटेकडी, नांदेड) याला अटक केली. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण? सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार या तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र आंचलच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध केला होता. कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले आहे.
२७ नोव्हेंबर रोजी सक्षमवर गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी घालून त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात दररोज नवे तपशील समोर येत असून तपास अधिक गतीने सुरू आहे.
सक्षमच्या आईचे गंभीर आरोप सक्षमच्या आईने आंचलचे वडील गजानन मामीडवार आणि भावांवर गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे असे : सुरुवातीला आंचलचा बाप सक्षमशी लग्न लावून देण्याची तयारी दर्शवत त्याच्यासोबत नाचत होता.
मात्र नंतर सक्षमवर पाळत ठेवून त्याचा “काटा कायमचा काढला”.
आंचलच्या भावाने सक्षमच्या वाढदिवसाला त्याला काटेरी गुलाबाचे झाड भेट दिले होते—त्याच दिवशी त्यांचा कट आखून ठेवला होता, असा आरोप तिने केला.




