नवी मुंबई – उलवे सेक्टर 25A परिसरात 22 वर्षीय कुमकुम बलविंदर कौर हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यूपूर्वी तिने रेकॉर्ड केलेली एक व्हॉईस नोट समोर आल्यानंतर पोलिस तपासाला नवे दिशानिर्देश मिळाले असल्याची माहिती आहे.
व्हॉईस नोटमध्ये शेजारीणीवर मानसिक त्रासाचा आरोपकुमकुमने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या मित्र संदीप याला पाठवलेल्या ऑडिओ संदेशात तिने शेजारीण अंजली शर्मा (२५) हिच्यामुळे ती मानसिकरीत्या त्रस्त झाल्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
कुटुंबीयांचा पोलिसांकडे तक्रार अर्ज घटनेनंतर मृत तरुणीचे कुटुंबीय पंजाबहून नवी मुंबईत आले. तिचा भाऊ गौरव बलविंदर कुमार यांनी उलवे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, अंजली शर्मा गेल्या काही महिन्यांपासून कुमकुमला मानसिक छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अंजली शर्माला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राजणे यांनी दिली.
घटनास्थळी मिळालेले पुरावे पोलिसांनी पंचनामा करताना राखाडी–पांढरा स्कार्फ जप्त केला आहे. हा स्कार्फ आत्महत्येसाठी वापरला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज असून तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
तसेच— कुमकुमचा मोबाईल फोन, कॉल डिटेल रेकॉर्ड, संदेश आणि सोशल मीडिया चॅट, यांचेही विश्लेषण सुरू आहे.
शेजाऱ्यांचे जबाब नोंदवणे सुरू
शेजारी राहणाऱ्या काही रहिवाशांच्या जबाबांमधून कुमकुम आणि अंजली यांच्यात पूर्वीही वाद झाले असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मानसिक छळाच्या दाव्याला तपासात महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रकरणाचा सखोल तपास सुरू कुमकुमने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण, शेजारीणीसोबतचे संबंध, तसेच इतर कोणते घटक कारणीभूत होते का, याची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या मते, फॉरेन्सिक अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळाल्यानंतर प्रकरणातील सत्य अधिक स्पष्ट होईल.
परिसरात चर्चांना उधाण घटनेनंतर उलवे परिसरात महिला सुरक्षितता, मानसिक छळ आणि शेजारी वाद यांसारख्या मुद्द्यांवर चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.





