जळगाव – शहरासह जिल्ह्यात घरफोड्यांच्या घटना सातत्याने घडत असून चोरट्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे चित्र समोर येत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमध्ये आता पिंप्राळा शिवारातील सोनी नगर परिसरात दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
माळी कुटुंबाचे घर फोडून सोन्याचे दागिने चोरले सोनी नगरातील गणेश भगवान माळी हे ३० नोव्हेंबर रोजी सहकुटुंब मूळ गावी गेले होते. ४ डिसेंबर रोजी सकाळी शेजारी राहणाऱ्या आशा भोई यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेला दिसल्याची माहिती दिली. माहिती मिळताच माळी कुटुंबीय घरी परतले असता, चोरट्यांनी घरातील— ३ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, १० ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, ६ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स
असा ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले.
त्याच गल्लीतील दुसरे घरदेखील फोडले चोरट्यांनी त्याच परिसरातील सुनिल रामदास सुरवाडे यांचेही बंद घर फोडले. त्यांच्या घरातून २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
सीसीटीव्हीमध्ये चार संशयित कैद घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पहाटेच्या सुमारास तोंडाला मास्क आणि रुमाल बांधलेले चार संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळले.
चोरीच्या सलग दोन घटना; नागरिकांत भीतीचे वातावरण एकाच रात्री दोन बंद घरे फोडल्यामुळे सोनी नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे.





