फत्तेपूर – फत्तेपूर गावात गावरान भट्टी, गावठी तसेच देशी दारूचा अवैध व्यापार निर्बंधाविना सुरू असून संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सुभाष नगर, फत्तेपूर स्मशानभूमी परिसर आणि काही आंतररस्त्यांवर हे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
गावातील स्मशानभूमी परिसरातही देशी दारू व गांजाच्या विक्रीस मुक्तपणे चालना मिळत असल्याने तेथील वातावरण असुरक्षित बनले आहे. काही दारुडे दारू पिऊन फत्तेपूर बसस्टँड परिसरात धिंगाणा घालत असल्याने प्रवाशांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सुभाष पुरा परिसरात रस्त्यावरच दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या दारुड्यांमुळे महिला वर्ग असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावातील अनेक रस्त्यांवर संध्याकाळी चालणेही धोकादायक झाले आहे.
अवैध दारूच्या या धंद्यांवर कधी कारवाई होणार? गावे या हातभट्टी व बेकायदेशीर दारूपासून कधी मुक्त होणार? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.




