जळगाव – शहराबाहेरील पाळधी–तरसोद बायपासवर आज भीषण अपघात झाला. इको कारचे टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पलटी मारत समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तरसोद फाट्याकडून पाळधीकडे जात असलेल्या चारचाकी वाहनाचे (क्र. MH 19 EG 1878) टायर फुटले. नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कंटेनर/ट्रेलरच्या (क्र. CJ 07 BR 3717) डिझेल टँकवर जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातात यश रमेश शिंपी (23, रा. पाळधी) आणि पल्लवी छाडीकर (20, रा. मेहरूण) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हातांना गंभीर दुखापत झाली असून यशच्या पायाला आणि डोक्यालाही मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी यश शिंपी यांची प्राथमिक तपासणी करून सीटी स्कॅन करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले असल्याचे समजते.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद सुरू असून अधिक तपास पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.





