जळगाव – मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट पूर्णपणे बिघडले आहे. महागाईच्या सावटाखाली लग्नसराईची खरेदी अधिकच कठीण झाली असून लोकांच्या चिंता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र, गुंतवणूकदारांसाठी ही किंमतवाढ ‘फायदेशीर संधी’ मानली जात आहे.
देशांतर्गत बाजारात या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात तब्बल 67% वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की जागतिक परिस्थिती, व्याजदर आणि रुपया-डॉलरचे मूल्य जर असेच राहिले किंवा अधिक कमकुवत झाले, तर 2026 मध्ये सोन्याच्या किमती आणखी 5% ते 16% वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातही यावर्षी सोन्यात सुमारे 60% वाढ नोंदवली गेली आहे.
फेडरल रिझर्व्हची 9–10 डिसेंबर रोजी होणारी बैठकही महत्त्वाची ठरणार आहे. व्याजदर कपातीची शक्यता जास्त असल्याने बाजारात सोन्याचे भाव आणखी उसळी घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदर घटले की बाँड्सवरील परतावा कमी होतो, त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्याकडे अधिक आकर्षित होतात.
चांदीही महाग; एका आठवड्यात 5,000 रुपयांची वाढ
सोन्यासोबतच चांदीच्या भावातही अस्थिरता दिसून येत आहे. 8 डिसेंबर रोजी चांदीचा भाव घसरून ₹1,89,900 प्रति किलो झाला असला, तरी एका आठवड्यात तब्बल ₹5,000 वाढ नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत $58.17 प्रति औंस इतकी आहे.
सराफा बाजारातील दर ‘आवाक्याबाहेर’
सोने–चांदीच्या वाढत्या दरांचा सराफा बाजारावर थेट परिणाम दिसत आहे.
22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर – ₹1,19,290
24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दर – ₹1,30,140
दरवाढीमुळे दागिने अत्यंत महाग झाले असून सामान्य ग्राहकांसाठी लग्नसराईत खरेदी करणे कठीण झाले आहे. अनेक कुटुंबांना बजेट पुन्हा आखावे लागत असून पुढील काही दिवसांत किंमती नियंत्रणात न आल्यास लग्नाच्या हंगामातील खरेदीवर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.





