अमळनेर – सासूला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या जावयाविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी जळोद रोडवरील आर्मी स्कूलच्या परिसरात घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मिनाबाई समाधान कोळी यांनी उपचारानंतर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री येथील मिनाबाई यांच्या मुलीचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी विनोद विक्रम कोळी (रा. खंबाळे, ता. शिरपूर) याच्याशी झाला होता. तीन वर्षांपूर्वी मुलीने आत्महत्या केली असली तरी विनोद सासरीच राहत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने दुसरे लग्न केले; काही दिवस तो अंबापिंप्री येथेच थांबला होता. चार महिन्यांपूर्वी नव्या पत्नीशी झालेल्या वादानंतर हे दाम्पत्य बिडगाव (ता. चोपडा) येथे गेले. त्याच काळात मिनाबाई यांच्या बदनामीवरून विनोद आणि तिचा मुलगा भरत यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
२४ नोव्हेंबर रोजी विनोदने वाद मिटवण्याचे कारण देत सासू मिनाबाई यांना पैलाड येथे बोलावले. त्या तेथे पोहोचताच त्याने त्यांना मोटरसायकलवर बसवून जळोद रस्त्यावरील खदानीजवळ नेले. अचानक हल्ला चढवून त्याने मिनाबाई यांच्या गालावर थप्पड मारल्या आणि त्यांच्या अंगावरील ८ ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने तसेच साधारण १० हजार रुपये किमतीची २ ग्रॅमची पोत असा मिळून जवळपास ५० हजारांचा ऐवज हिसकावून पळ काढला.
मारहाणीत मिनाबाई बेशुद्ध पडल्या. काही वेळाने प्रवाश्यांच्या मदतीने त्या अमळनेर येथे पोहोचल्या. मुलाच्या साहाय्याने त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. विनोद कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.





