मुंबई – नाशिक येथे खोदकामात मिळाल्याचा बहाणा करून पुरातन सोन्याच्या माळा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवत मालाडमधील भांडी विक्रेत्याची तब्बल २५ लाखांची फसवणूक करण्यात आली. सोनाराकडे तपासणीसाठी दिल्यावर या माळा सोन्याच्या नसून तांबे व निकेलपासून बनवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विक्रेत्याने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मालाडमधील भांडी दुकानात मोहन उर्फ ‘सिरोही काका’ नावाचा एक व्यक्ती तीन स्टीलचे ग्लास खरेदी करण्यासाठी आला. मारवाडी भाषेत बोलल्याने व्यापाऱ्याने त्याच्याशी संवाद साधला असता, तो स्वतःला राजस्थानमधील सिरोही येथील असल्याचे सांगून निघून गेला. दोन दिवसांनी तो पुन्हा आला आणि स्टीलच्या दोन वाट्या घेताना त्याने खोदकामात सापडल्याचा दावा करत चांदीचे एक नाणे दाखवले.
तिसऱ्यांदा मोहन पुन्हा दुकानात आला, यावेळी त्याच्यासोबत एक तरुण होता. त्याला ‘भाचा’ म्हणून ओळख करून देत मोहनने सोन्याची एक बोरमाळ दाखवली. माळेतील दोन मणी काढून तपासणीसाठी देण्यात आले आणि ते खरे असल्याचे समोर आले. व्यापाऱ्याचा विश्वास बसल्याचे पाहून मोहनने जवळपास एक किलो वजनाच्या अनेक बोरमाळा स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले.
सोन्याचे वाढते दर पाहता व्यापारीही लोभाला बळी पडला आणि २५ लाखांत माळा घेण्याचे ठरले. पैसे घेऊन व्यापारी नॅशनल पार्कजवळ पोहोचला असता, मोहनने त्याला साईधाम मंदिर, ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात नेले व तेथे व्यवहार पार पडला. मात्र, दुसऱ्या दिवशी सोनाराकडे तपासणी केली असता, माळा सोन्याच्या नसून तांबे-निकेलची बनावट असल्याचे उघड झाले.
फसवणूक कळताच व्यापाऱ्याने मोहनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा फोन बंद होता. अखेर २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी भांडी विक्रेत्याने मालाड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.





