उत्तरेकडील शीत लहरी पुन्हा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून जळगावातही गारठ्याची कडाक्याची अनुभूती होत आहे. ७ डिसेंबरला जळगावचे किमान तापमान १२ अंश सेल्सिअस नोंदवले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी तापमानात तब्बल ३ अंशांची घसरण झाली आणि रात्रीचा पारा थेट ९.४ अंश सेल्सिअसवर आला. त्यामुळे जळगावकर अक्षरशः थरथर कापू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात किमान तापमान १२ अंशांच्या आसपास होते. रात्री व पहाटेच्या वेळी थंडी बोचरी जाणवत असली तरी दुपारपाठोपाठ उन्हाची चटका देणारी ऊब जाणवत होती. सोमवारी किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८ अंश नोंदले गेले. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे थंडीचा प्रभाव आणखी वाढल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण आहे.
हवामान खात्यानुसार, पुढील १५ दिवस जळगाव जिल्ह्यात किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिना पूर्णतः कोरडा राहणार असून या काळात एक ते दोन वेळा थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
थंडीचा फायदा रब्बी पिकांना
कडाक्याची ही थंडी रब्बी हंगामासाठी वरदान असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः हरभरा आणि गहू या पिकांना थंड हवामानाचा मोठा फायदा होतो. गेल्या वर्षी ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदा कोरडी हवा आणि सातत्याने टिकणारी थंडी यामुळे दोन्ही पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.





