मुंबई : देशभरासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला असून उत्तरेकडील थंडीचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे. राज्यात थंडीची लाट निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी थंडीचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
राज्यात तापमानात मोठी घट गेल्या २४ तासांत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात आणखी घसरण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यात तापमानाचा पारा 8.9 अंशांवर पोहोचला असून मुंबईतही तापमान घटल्याने थंडी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांसाठी हवामान खात्याने थंडीचा यलो अलर्ट जाहीर केला आहे.
धुळ्यात सर्वाधिक निचांकी तापमान राज्यातील सर्वांत कमी तापमान धुळे जिल्ह्यात नोंदवण्यात आले असून ते 5.3 अंश सेल्सिअस आहे. परभणीमध्ये तापमान 5.9 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. पुणे, गोंदिया, जळगाव, अहिल्यानगर येथे तापमानाचा पारा 9 अंशांपर्यंत घसरला आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, देशातील सर्वात निचांकी तापमान पंजाबमधील गुरदासपूरमध्ये 4.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
दक्षिण भारतात पावसाचा इशारा कडाक्याच्या थंडीबरोबरच दक्षिण भारतात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकात 10 ते 13 डिसेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





