पाळधी | प्रतिनिधी : दिपक धनगर – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात तात्काळ दारूबंदी लागू करावी या ठोस मागणीसाठी 6 ते 9 डिसेंबर दरम्यान वर्धा (सेवाग्राम) ते नागपूर अशी भव्य पायी पदयात्रा काढण्यात आली. या दारूबंदी पदयात्रा मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सरकारला चांगलेच धारेवर धरले.
या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा यांच्या वतीने करण्यात आले होते. या पदयात्रेचे नेतृत्व संघटनेच्या अध्यक्षा धुळे येथील गितांजली ताई कोळी व लिलाताई कोळी यांनी केले. त्यांच्या सोबत रोहित इ, मुन्ना दादा, नंदुरबार येथील उषाताई दावळे, नागपूर येथील प्रेमदास नंदनवार, माधुरी ताई जलमुलवार, रेशमाताई, कांबळे ताई यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या जोरदार आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने तात्काळ पावले उचलत गितांजली ताई कोळी व उपस्थित महिला भगिनींना विधानभवन येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त मा. श्री गणेश नाईक साहेब यांच्यासोबत चर्चेसाठी बोलावले.
या चर्चेदरम्यान मा. गणेश नाईक साहेबांनी दारूबंदी विषयावर सकारात्मक चर्चा करत मंत्रीमंडळ व मुख्यमंत्री महोदयांसोबत याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रात दारूबंदी झालीच पाहिजे ही मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचवून तिचा पाठपुरावा सुरू झाल्याने, हे आंदोलन महिला भगिनींसाठी दारूबंदी क्रांतीकडे नेणारे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.





